'भरारी' संस्था 'भरारी' चे सेवाव्रत अधिक माहिती अपेक्षित सहभाग संपर्क साधा
सस्नेह निमंत्रण : प्रतिवर्षीप्रमाणे रविवार २४ जुलै २०१६ रोजी सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. सायं.५ ते ७ ह्या वेळेत तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा हि विनंती. पत्ता : भरारी अपंगालय, साईधारा टॉवर, विद्यानिकेतन जवळ, मानपाडा-माणगाव, डोंबिवली (पूर्व). एड.विनायक मालवणकर (अध्यक्ष) - ९९३०१४७४९४.

आमचे भाऊ....

 

भरारीच्या नुकत्याच संपन्न झालेल्या उपक्रमांविषयी...

 

 

 

  भरारी.... अपंगांसाठी सेवाव्रत !  

साधारण १९९४ च्या सुमाराची गोष्ट असेल. मुंबईजवळच्या डोंबिवली शहरात एका दुर्लक्षित बगिच्यात सहा-सात अपंग मित्र दर रविवारी भेटत असत. विजय प्रधान (भाऊ), दिलीप अढळीकर, संजीव मांद्रेकर, मंदार दीक्षित, चंद्रशेखर बेजकर, विनोद शहा हे त्यापैकी प्रमुख. एकत्र जमून सुख-दु:खांच्या गप्पागोष्टी, हास्यविनोद इतकाच मर्यादित या भेटींचा उद्देश असे. परिसरातील लोकांनाही या मंडळींचे, त्यांच्या आनंदी वृत्तीचे कौतुक वाटत असे. अशा लोकांपैकीच एक डॉ.अंजली आपटे होत्या. स्वत: फिजिओथेरपिस्ट असल्याने त्यांना थोडी अधिक उत्सुकता असे. या भेटीगाठी उघडया बागेत असल्याने पावसाळयामुळे त्यात खंड पडत असे. पावसाळयात ही मंडळी दिसली नाहीत की लोकांना चुकल्यासारखे वाटत असे. आपटे मॅडमनीच या मंडळींना एकदा सुचविले की तुम्ही या भेटींना विधायक स्वरूप का देत नाही? एखादी संस्था सुरू करूया, जी फक्त अपंगांसाठी कार्य करेल. त्यांच्या समस्यांवर उत्तर शोधेल. तुमच्यासारख्या अन्य अपंग बांधवांनाही सामील करून घेता येईल. मी आणि माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते तुम्हाला सहकार्य करतील.

ही गोष्ट सर्वांच्याच मनात होती तिला मॅडमनी वाचा फोडली आणि मग इतर अपंग मित्रांचा शोध सुरू झाला. पाहता पाहता संख्या वाढली आणि डिसेंबर १९९६ या जागतिक अपंग दिनाच्या मुहूर्तावर 'भरारी अस्थिव्यंग विकलांग संस्था' स्थापन झाली. ख्यातनाम मराठी साहित्यिक पु. भा. भावे यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती प्रभावती भावे यांनी 'भरारी' चा दीप प्रज्वलित केला. विजय प्रधान (भाऊ) यांची एकमताने अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि एका सेवाव्रती चळवळीने 'भरारी' घेतली.

अपंगांचे पुनर्वसन, प्रशिक्षण आणि उपचार अशा अनेक अंगांनी कार्य सुरू झाले. अपंगत्व दाखला मिळविण्यासाठी मुंबईला खेटे मारण्याची वेळ येऊ नये म्हणून दाखला शिबीरांचे आयोजन करून सुरुवात झाली. आजपर्यंत चार हजारांहून अधिक दाखले या माध्यमातून मिळवून देण्यात आले. गेल्या बारा वर्षांच्या वाटचालीत अनेक उपक्रम संस्थेने राबविले.

या तप:पूर्ति वर्षातच 'भरारी'च्या पंखांना ज्यांनी आपल्या जिद्दीने बळ दिले त्या विजय प्रधान (भाऊ) यांचे निधन झाले. त्यांची स्वप्ने साकारण्यासाठी सारे सभासद, कार्यकर्ते आणि हितचिंतकांच्या सहकार्याने 'भरारी' कटिबध्द आहे.

 

हे संकेतस्थळ उत्तमरित्या पाहण्यास आवश्यक स्क्रीन रिझोल्यूशन १०२४ ७६८.                                       आरेखन व संकल्पना : नेक्स्टजेन